अरूणव मजुमदार व वैष्णवी अडकर यांनी उच्चस्तरीय टेनिस खेळ दर्शवला. त्यांनी अंडर-१६ वयोगटातील मुले व मुलींसाठी एमएसएलटीए – योनेक्स सनराईज एपीएमटीए ऑल इंडिया रँकिंग नॅशनल सिरीज (७) टेनिस टुर्नामेण्टमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर अनुक्रमे बॉईज सिंगल्स व गर्ल्स सिंगल्समध्ये घवघवीत यश मिळवले.
अरूणव मजुमदारने साहिल तांबटचा ६-२, ६-० असा पराभव करत बॉईज सिंगल्स शीर्षक जिंकले. जैस्नव शिंदे व दक्ष प्रसाद यांनी बॉईज डबल्स शीर्षक जिंकले. त्यांनी साहिल तांबट व रित्विक नादीकुडे यांचा ७-५, ६-४ असा पराभव केला. वैष्णवी अडकरसाठी दुहेरी आनंद होता. तिने गर्ल्स सिंगल्स फायनमध्ये लक्ष्मी अरूणकुमारचा ६-२, ६-३ असा पराभव केला. सिंगल्समध्ये एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या या जोडीने गर्ल्स डबल्समध्ये सुर्यांशी तन्वर व सई भ्यार यांचा ६-२, ६-३ असा पराभव केला. या स्पर्धेतील साखळी सामने गेल्या आठवड्यामध्ये खेळवण्यात आले आणि २५ व २६ जानेवारी रोजी दोन दिवस पात्रता फेरी खेळवण्यात आल्या. अव्वल पुरस्कार जिंकण्याची स्पर्धा सामन्यांच्या मुख्य ड्रॉसह सोमवार २७ जानेवारी रोजी सुरू झाली आणि आज सामन्यांची अंतिम फेरी मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर खेळवण्यात आली.
या स्पर्धेबाबत बोलताना महाराष्ट्र टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले, ”या उदयोन्मुख सुपरस्टार्सचा उच्चस्तरीय टेनिस खेळ पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे, तसेच आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेला प्रेक्षकवर्ग पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आम्ही राज्यामध्ये या खेळाला चालना देण्याप्रती सर्वतोपरी प्रयत्नरत आहोत. मला विश्वास आहे की, ही मुले-मुली खेळाला लोकप्रिय बनवण्यासाठी इतरांना देखील प्रोत्साहित करतील. आमच्यासह अदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस अकॅडमी अधिक दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे खेळाडू भविष्यात राज्याचे व देशाचे प्रतिनिधीत्व करतील. मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि भावी पर्वांमध्ये अशा अनेक उदयोन्मुख प्रतिभांना भेटण्याची आशा करतो.”
भारतातील टेनिस नियामक मंडळ हे ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) या स्पर्धेचे कार्यसंचालन पाहते. या असोसिएशनला इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (आयटीएफ) आणि एशियन टेनिस फेडरेशन (एटीएफ) यांचा सहयोग लाभला आहे.