‘आठवणीतलं पुणं सायकलींचं पुणं’

Don't Miss It Marathi

लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी ‘आठवणींचं पुणं…सायकलींचं पुणं’ या संकल्पनेवर आधारित ‘पुणे सायक्लोथॉन ३.०’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा ‘सायकलींचे पुणे’ची अनुभूती घेता येणार आहे. पुणे सायक्लोथॉनचे हे तिसरे वर्ष असून, रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी थोर समाजसेवक, पर्यावरण संवर्धक आणि महारोगी सेवा समितीचे, लोक बिरादरी प्रकल्पाचे संस्थापक ‘तीर्थरूप बाबा आमटे’ यांच्या पुण्यतिथीदिवशी, बाबांच्या स्मरणार्थ सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत होणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या आवारातून या ‘पुणे सायक्लोथॉन ३.०’ ला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत लोकबिरादरी मित्र मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा तांबे,  योगेश कुलकर्णी, ऐश्वर्या चपळगावकर यांनी दिली. नितीन पवार, सलोनी कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते.

योगेश कुलकर्णी म्हणाले, “महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम भागातील कुष्टरुग्णांच्या/ आदिवासींच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या आमटे कुटुंबियांच्या गेल्या तीन पिढ्यांच्या सामाजिक वारशाचे उदाहरण शोधूनही सापडणे कठीण आहे. याच तीन पिढ्यांचा हाच वारसा पुणेकरांच्या तीन पिढ्यांनी घेऊन, लहान मुले, आई-बाबा आणि आजी-आजोबा या सर्वांनी मिळून, किमान शक्य असेल तेव्हा, शक्य असेल तेवढा वेळ एकत्र सायकल चालवावी असा संदेश देणारी ही रॅली आहे. आपल्या पुण्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी, शुद्ध हवेसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र घालवता येणाऱ्या वेळेचे सोने करावे, यासाठी पुणे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात कुटुंबातील तीन पिढ्यांसोबतच काही प्रोफेशनल आणि हौशी सायकलिंग ग्रुप्स, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, पोस्टमन, सीए, डॉक्टर्स, व्यावसायिक व नोकरदार अशा सर्वच वर्गातील लोक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत.

“ही सायकल रॅली २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन प्रमुख मार्गांमध्ये विभागण्यात आली आहे. पहिला मार्ग (२१ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ रस्ता, बावधन, चांदणी चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा आहे. दुसरा मार्ग (१० किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता पुणे विद्यापीठ रस्ता, चतुःशृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा आहे. तर तिसरा  ५ किलोमीटरचा मार्ग स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, स. प. महाविद्यालय असा आहे, असे शिल्पा तांबे सांगितले.

 ‘सायकलींचे पुणे’ अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयातून सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष संदेश घेऊन येणारे ग्रुप्स, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, सर्वात छोटा सायकलस्वार अथवा सर्वात मोठा गट अश्या काही विशेष सहभागाचे कौतुक यावेळी केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा तांबे (९२२६९५८८८८) आणि योगेश कुलकर्णी (९८२२२७३५४५) या क्रमांकावर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *