‘आयओटी’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना जागतिक यश

Marathi

‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे मानवी समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत पुण्यातील आनंद ललवाणी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ‘कीसाईट आयओटी इनोव्हेशन चॅलेंज’ नावाच्या या स्पर्धेत आनंद यांच्या संघाने सर्वोत्तम संशोधनासाठीचे एकूण तब्बल १००,००० डॉलरचे पारितोषिक पटकावले आहे.

‘कीसाईट टेक्नॉलॉजीज’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील सादरीकरणे नुकतीच न्यूयॉर्कमध्ये तज्ञ परीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. पुण्यातील आनंद ललवाणी हे सध्या कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे अध्ययन करीत असून या स्पर्धेसाठीच्या त्यांच्या संघात मॅक्स हॉलिडे या विद्यार्थ्याचाही समावेश होता.

पाण्यात बुडवून ठेवण्याजोग्या आयओटी सेन्सर्सद्वारे दुरूनही पाण्याच्या गुणवत्तेवर कसे लक्ष ठेवता येईल, हा आनंद यांच्या संघाच्या सादरीकरणाचा विषय होता. त्यासाठी त्यांना ५०,००० डॉलरचे रोख ‘ग्रँड प्राईज’ प्रदान करण्यात आले, तसेच त्यांच्या विद्यापीठास ५०,००० डॉलर मूल्याची ‘कीसाईट’ निर्मित चाचणी उपकरणे देण्यात आली. पाण्याच्या प्रदूषणावर या उपकरणामुळे एक सक्षम उपायच शोधला गेला आहे.

आनंद ललवाणी म्हणाले, ‘‘या स्पर्धेमुळे विद्यार्थी म्हणून मी करत असलेल्या संशोधनास नवी दिशा मिळाली आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्राच्या व्याप्तीची आणखी चांगली माहिती आम्हाला झाली आणि त्यामुळे आमच्या विचारांना चालनाच मिळाली.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *