अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे. “,असे मत ‘काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रीसर्च’चे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील ‘डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर’च्या (डीसीसीआयए) सतराव्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. संस्थेचा रौप्य महोत्सव देखील या वेळी साजरा करण्यात आला. ‘डीसीसीआयए’चे अध्यक्ष प्रकाश धोका आणि उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव यांनी या वेळी संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला, तसेच सध्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. संस्थेचे सचिव रथिन सिन्हा, खजिनदार सुरिंदर अगरवाल, योगेश वाघानी, व्ही. एल. मालू, राजीव लोकरे, पंडित पाळंदे, अनिल गुप्ता आदि या वेळी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबरोबरच गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरविणा-या राजकुमार खिंवसरा यांना डीसीसीआयएतर्फे सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘स्वारोस्की इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक वेर्नर प्लॉनर यांना मांडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर सहल क्षेत्रातील उद्योजक केसरी पाटील यांना ‘बेस्ट इंडस्ट्रिआलिस्ट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. केसरी पाटील यांच्या वतीने त्यांच्या कन्या झेलम चौबळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.मांडे म्हणाले,‘‘उद्योग क्षेत्रास इंडस्ट्री फोर पॉईंट झीरो, आयओटी, आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंगसंदर्भात मदत करण्यास ‘सीएसआयआर’ नेहमीच तयार आहे. एकत्रितपणे या विषयांमध्ये काम केल्यास देशाच्या प्रगतीला आपण निश्चित हातभार लावू शकू आणि भारताला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देऊ शकू.”
मांडे यांच्या हस्ते या वेळी संस्थेच्या ‘स्पर्श’ या वार्षिक अंकाचेही अनावरण करण्यात आले.
या वेळी ‘बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ वाईका इन्स्ट्रुमेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला, तर ‘बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ ‘इन्फायलूम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला प्रदान करण्यात आला. याबरोबरच ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज लिमिटेड’, ‘केमेटॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एव्हरी डेनिसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला ‘एचआर’ आणि ‘सेफ्टी प्रॅक्टिसेस’ स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.