एमएसआरडीसी, फोक्सवॅगन ग्रुप इंडिया आणि सेव्हलाइफ फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सुरू केला व्हिजन झिरो उपक्रम

Marathi

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (एनएच ४८) अपघाती मृत्यू लक्षणीयरित्या कमी करण्याच्या दृष्टीने तसेच हा महामार्ग त्यावरून जाणाऱ्या सर्वांसाठी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), फोक्सवॅगन ग्रुप ऑफ इंडिया आणि सेव्हलाइफ फाऊंडेशन यांनी आज व्हिजन झिरो या मोहिमेचा अधिकृतरित्या शुभारंभ केला. भारतातील सर्व महामार्गांवर सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात राबवण्याजोगे एक प्रारूप तयार करण्याचे उद्दिष्ट या सहयोगामागे आहे. ब्रेसिलिया जाहीरनाम्यानुसार रस्त्यावरील अपघाती मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या भारताच्या वायद्याशी सुसंगत असे हे अभियान आहे.

देशातील रस्त्यांच्या एकंदर जाळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग केवळ दोन टक्के असले, तरी रस्ते अपघातांत होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के महामार्गांवर होतात. याचा अर्थ राष्ट्रीय महामार्गांवर दररोज सरासरी १४५ हून अधिक अपघाती मृत्यू होतात.

ही प्रचंड मनुष्यहानी रोखण्यासाठी उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र पोलिस आणि सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या माध्यमातून सेव्हलाइफ फाऊंडेशन आणि फोक्सवॅगन ग्रुप ऑफ इंडिया यांच्याशी सहयोग केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महापरिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून या भागीदारीची घोषणा केली होती. आज अधिकृतरित्‍या हा उपक्रम सादर करण्‍यात आला. 

महाराष्ट्राचे माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री. एकनाथ शिंदे याप्रसंगी म्हणाले, “रस्त्यावरील लोकांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे. अन्य राज्यांनी अनुकरण करावे असे प्रारूप मला महाराष्ट्रात तयार करायचे आहे. यासाठी रस्ते सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धती राबवण्यात येतील. रस्त्यांवर होणारे अपघाती मृत्यू टाळण्याजोगे असतात आणि एनएच ४८वरील अपघाती मृत्यूंची संख्या शून्याच्या जवळ आणण्याचे उद्दिष्ट ठेवून आखलेल्या व्हिजन झिरोबद्दल मी खूप आशावादी आहे.”

एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. आर.एल. मोपलवार या अभियानाबद्दल म्हणाले, “रस्‍ता सुरक्षेला अगदी नियोजनाच्‍या टप्‍प्‍यापासून पायाभूत प्रकल्‍पांच्‍या अंमलबजावणीमध्‍ये संघटित करण्‍याची गरज आहे. धोरणकर्त्‍यांसाठी ही मुख्‍य समस्‍या आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला तर आपण निश्चितच बदल घडवून आणू शकतो. आम्‍हाला विश्‍वास आहे की, व्हिजन झिरोच्‍या माध्‍यमातून आम्‍ही रस्‍त्‍यावर प्रवास करणा-या व्‍यक्‍तींचे, खासकरून असुरक्षितांचे संरक्षण करू शकतो.” 

डेटा तसेच पुराव्यावर आधारित उपायांच्या माध्यमातून रस्त्यावरील अपघाती मृत्यूंची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यावर व्हिजन झिरोचा भर आहे. या उपक्रमात रस्ते इंजिनीयरिंगचे उपाय, अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन सेवेत सुधारणा, सर्वसमावेशक संशोधन, पोलिसांची अधिक कुमक आणि अगदी सुरुवातीच्या स्तरापासून सर्वांगीण पद्धतीने समाजाला सामावून घेणे आदींचा समावेश होतो. रस्ते अपघात टाळण्यासाठी व्यवस्थात्मक सुधारणा करण्याच्या कामाला प्रसार व जागरूकता मोहिमांची जोड दिली जाईल आणि या १११ किलोमीटर मार्गावर आपत्कालीन सेवा तातडीने पुरवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल.

या सहयोगाबाबत बोलताना फोक्सवॅगन ग्रुप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गुरूप्रताप बोपराय या सहयोगाबद्दल म्हणाले, “शाश्वत वाहतुकीच्या आमच्या संकल्पनेचा सुरक्षितता हा अविभाज्य घटक आहे. आम्हाला म्हणजेच फोक्सवॅगन ग्रुप इंडियाला सर्वांत सुरक्षित गाड्या तर घडवायच्या आहेतच, शिवाय व्हिजन झिरोच्या माध्यमातून आम्हाला रस्‍त्‍यांवरील दुर्घटना व दुखापतींपासून प्रवाशांचे संरक्षण करणारी अधिक सुरक्षित परिसंस्था विकसित करण्यासाठी काम करायचे आहे. सेव्हलाइफ फाऊंडेशन आणि एमएसआरडीसीसोबतच्या या निकोप सार्वजनिक-खासगी सहयोगाच्या माध्यमातून आमच्या रस्ते सुरक्षिततेसंदर्भातील कौशल्याचा उपयोग करण्यास व स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास आम्हाला आवडेल.”

सेव्हलाइफ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पियुष तेवारी या उपक्रमाबद्दल म्हणाले, “रस्ते सुरक्षिततेसाठी भक्कम राजकीय इच्छाशक्ती आणि सखोल आंतरसंस्था सहयोग यांचा मेळ बसणे आवश्यक असते. महाराष्ट्रात हे दोन्ही शक्य आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि व्हिजन झिरो या उपक्रमामुळे एनएच ४८ अधिक सुरक्षित होईल, अशी खात्री आम्हाला आहे. महामार्गावर आयुष्य वाचवण्यासाठी पुरावाधारित उपाय अंमलात आणले जातील, याची काळजी सेव्हलाइफ फाऊंडेशन घेईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *