‘शिकतानाच उद्योगांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये वाढतात. तसेच कोणत्याही समस्येवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याची हातोटी आणि उद्योजकाची मानसिकता त्यांच्यात तयार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणे महत्त्वाचे आहे.’’ , असे मत ज्येष्ठ उद्योजक अतुल किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता व नावीन्यपूर्ण संशोधनास चालना देण्यासाठी पुण्याजवळ मावळ येथे असलेल्या ‘किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज’मध्ये (केआयएएमएस) ‘इंडस्ट्री ४.० लॅब’- ‘सुमन’ अर्थात ‘सस्टेनेबल युनिव्हर्सल मॅन्युफॅक्चरिंग ऑगमेंटेड नोड’ या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचे आज ज्येष्ठ उद्योजक व केआयएएमएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर आणि त्यांच्या मातोश्री सुमन किर्लोस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याद्वारे ‘केआयएएमएस’मधील विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा सुविधांमध्ये ‘डेटा अॅनालिटिक्स लॅब’, ‘स्टार्ट-अप इन्क्यूबेशन सेंटर’ यासह ‘ इंडस्ट्री ४.०’ लॅबचीही भर पडली आहे.
केआयएएमएसचे संचालक डॉ. एल. के. त्रिपाठी, प्रकल्प संचालक (बिझनेस अॅनालिटिक्स अँड कॉर्पोरेट रिलेशन्स) प्रो. पंकज रॉय गुप्ता, ‘समर्थ उद्योग टेक्नॉलॉजी फोरम’चे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर, ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे, ‘केआयएएमएस’च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, क्लाऊडक्यू टेक्नॉलॉजीजचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आदित्य परांजपे आदि या वेळी उपस्थित होते.
ही ‘इंडस्ट्री ४.० लॅब’ पुण्यातील ‘सीफोरआयफोर’ (सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०) या केंद्राच्या सहकार्याने स्थापन झाली आहे. यातील ‘सीफोरआयफोर लॅब’ला केंद्र सरकारच्या अवजड उद्योग विभागाचे साहाय्य मिळाले आहे. केआयएएमएसमधील ‘इंडस्ट्री ४.० लॅब’ अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये काम करणा-या व्यक्तींशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची आणि स्वतःच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे, तसेच काही अद्ययावत ‘अॅनालिटिक्स टूल्स’च्या माध्यमातून शिकता येणार आहे. ‘इंडस्ट्री ४.०’ ही चौथी औद्योगिक क्रांती समजली जात असून देशात उत्पादनामध्ये अद्ययावत व ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जावा यासाठी ही केंद्रे एक प्रकारे दुवा म्हणून काम करतात.
‘ ‘इंडस्ट्री ४.० लॅब’मुळे विद्यार्थ्यांबरोबर उद्योगांमध्ये काम करणा-या लोकांनाही मदत होणार आहे. त्यामुळे ‘केआयएएमएस’सारख्या शिक्षणसंस्थेत या प्रकारची लॅब स्थापन होणे दोहोंसाठी फायद्याचेच आहे,’ असे किर्लोस्कर यांनी सांगितले.