गुरुत्त्व ऊर्जेवर चालणा-या कमी खर्चिक दिव्याची निर्मिती

Marathi

गुरुत्त्वीय ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश निर्माण करण्याचे तंत्र नवीन नसले तरी सध्या त्याचा प्रत्यक्ष वापर चांगलाच खर्चिक आहे. पुण्यातील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमधील (गणेशनगर) अनिकेत घिसाड आणि नचिकेत मेंडकी या विद्यार्थ्यांनी मात्र आपल्या शिक्षकांच्या मदतीने गुरुत्त्व ऊर्जेवर चालणारा कमी खर्चिक दिवा बनवला आहे.


नीती आयोगाने सुरू केलेल्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत शाळेत स्थापन करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’मध्ये या मुलांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची नुकतीच केंद्र सरकारने दखल घेतली असून बालदिनाच्या दिवशी ‘अटल इनोव्हेशन मॅरेथॉन’मधील निवडक प्रकल्प म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर हा प्रकल्प सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. या निमित्ताने त्यांना राष्ट्रीय स्तरावर  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करता आले. इतकेच नव्हे, त्यानंतर  मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या खास ‘बूट कँप’साठी या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले. या बूट कँपची गुरूवार दि. १९ डिसेंबर रोजी सांगता झाली. या प्रकारच्या संशोधनाचे पुढे व्यापक व यशस्वी व्यवसायात किंवा ‘पेटंट’मध्ये कसे रुपांतर करता येईल याचे मार्गदर्शन या कँपमध्ये विद्यार्थ्यांना मिळाले. 


शालेय मुलांमध्ये नवनिर्मितीविषयी कुतुहल निर्माण करणे आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे हा ‘अटल टिंकरिंग लॅब’ उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी होणा-या शाळांमध्ये मुले शिक्षकांची मदत घेऊन सातत्याने नवीन कल्पनांवर विचार करतात आणि सामान्य नागरिकांना भेडसावणा-या समस्यांवर सोपे आणि खर्चिक नसलेले उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.

गुरुत्वीय दिव्यामध्ये दगड-मातीचा वापर होत असून आणि गुरुत्वीय ऊर्जेद्वारे त्यांची हालचाल घडवून आणून त्यापासून प्रकाश निर्माण केला जातो. कलमाडी हायस्कूल येथे शास्त्र व गणित शिकवणा-या शिक्षिका आणि अटल टिंकरिंग लॅबमधील मार्गदर्शक स्वाती काळे म्हणाल्या, ‘‘सध्या बाजारात उपलब्ध असलेला गुरुत्वीय दिवा सुमारे १० हजार रुपयांना मिळत असून तो एका वेळी २० मिनिटे चालतो. परंतु अनिकेत आणि नचिकेतने बनवलेल्या ‘प्रोजेक्ट गुरू’ या गुरूत्वीय दिव्यात त्यांनी अनेक सुधारणा करून त्याची किंमत ५०० ते ७०० रुपयांवर आणली आहे. सध्या हा दिवा १० मिनिटे चालू शकतो, परंतु त्यात आणखी सुधारणा करून तो १ तास चालवता येऊ शकेल.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *