कारुण्य, चैतन्य, प्रेम याने भरलेली सुरेल सांज पुणेकरांनी अनुभवली. महेश काळे यांच्या चैतन्यमयी सुरांची जादुगरी अन कारुण्यमयी सुरांनी साबीर सुलतान खान यांनी रसिकांवर केलेल्या सुरेल प्रेमाच्या बरसातीत रसिक न्हाऊन निघाले. निमित्त होते ‘मित्र महोत्सवा’चे.
पुण्यातील मित्र फाउंडेशनच्या वतीने ‘मित्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे आयोजित या दोन दिवसांच्या महोत्सवाची आज सुरुवात झाली. महोत्सवाचे हे ४थे वर्ष आहे. यावेळी मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले, भारत फोर्जच्या सुनिता कल्याणी, फ्लीटगार्डचेनिरंजन किर्लोस्कर आदि मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात शनिवारी सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग ‘गावती’ने गायनाला सुरुवात करत ‘तुम्हारी चरण की आस लागी…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. त्यांच्या गायकीतील वैशिष्ट्य असणाऱ्या आलाप आणि ताना यांनी आजही रासिक श्रोत्यांची भरभरून दाद मिळविली. ‘हमारी पार करो साई…’ ही रचना त्यांनी यावेळी सादर केली. “गेल्या ४-५ वर्षांमध्ये मंचावर शास्त्रीय गायन करण्याची संधी फार कमी मिळते.” असे म्हणत आज खास पं. भैरवनाथ भट्ट यांची रागमाला त्यांनी पेश केली. पं जितेंद्र अभिषेकी यांनी ती अनेकदा सादर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘हिंडोल गावत सब…’ या रचनेने या रागमालेची त्यांनी सुरुवात केली. त्यांनतर ‘देवा घरचे ज्ञात कुणाला…’ कट्यार काळजात घुसली मधील ‘सुरात पियाबिन छीन बिसरायी…’ हे नाट्यपद सादर केले. अखेर तराणा पेश करून त्यांनी आपल्या या मैफलीला विराम दिला. कायमच रसिकांचे भरभरून प्रेम मिळत असणाऱ्या या कलाकाराला अखेरीस उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी दाद दिली. यावेळी निखिल फाटक (तबला), राजीव तांबे (हार्मोनियम), प्रसाद जोशी (पखवाज) व उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) यांनी त्यांना साथसंगत केली.
यानंतर साबीर सुलतान खान यांचे सारंगी वादन झाले. त्यांनी राग वाचस्पतीने आपल्या वादनाची सुरुवात केली. सारंगीच्या सुरांमधील कारुण्य आणि प्रेम यांने वातावरणात सुखद लहरी पसरल्या. रागाचा विस्तार, आपल, झाला, जोड झाला यालाही रसिकांनी वाह वा ची दाद देत समेवर ताल धरला. मींड ला रसिकांची विशेष दाद मिळाली. “पुणेकरांनी मला नेहमीच खूप प्रेम दिले. म्हणूनच मी जास्तीत जास्त काळ पुण्यातच असतो. जर श्रोते चांगले नसते तर आम्हा कलाकारांचे अस्तित्वच नसते. म्हणून मी माझे प्रेम या संगीतातूनच तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो.” अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना रामदास पळसुले यांनी तबल्याची साथसंगत केली.