डॉ. लागूंना समर्पित चित्रपट महोत्सवातील पुरस्कार माझ्यासाठी खास- विक्रम गोखले

Marathi

मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले परंतु डॉ. श्रीराम लागू यांना समर्पित केलेल्या ‘पिफ’ चित्रपट महोत्सवात आज मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खास आहे. डॉ. लागू यांच्याशी माझे फार जवळच्या मैत्रीचे नाते होते. मी ४० वर्षे त्यांचा अभिनय पाहिला आणि त्याचा अभ्यास करत आलो. या अद्वितीय अभिनेत्याचा मृत्यू मला माझे वैयक्तिक नुकसान वाटते,’’ असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’चे आज बालगंधर्व रंगमंदिर येथे दणक्यात उद्घाटन करण्यात आले. या वेळी गोखले यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते.  
याच समारंभात एटीआयआयचे अध्यक्ष व  दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनाही ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ प्रदान करून सन्मान करण्यात आला. खन्ना या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ या पिफ महोत्सवाच्या ‘थीम’ला अनुसरून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी नृत्य व आदिवासी नृत्य या वेळी सादर करण्यात आले.

महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महापौर मुरलीधर मोहोळ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी यांच्यासह प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता सुबोध भावे या वेळी उपस्थित होते.

‘‘माझे वडील चंद्रकांत गोखले आज असते तर त्यांना या जानेवारीत १०० वर्षे पूर्ण झाली असती. ते डॉ. लागूंचे चाहते होते,’’ असे म्हणत विक्रम गोखले यांनी आपला पुरस्कार वडिलांना समर्पित केला. ‘‘आदिवासी संस्कृतीवर आधारित नृत्यसंगीत हा आपला ठेवा असून डीजे लावून नाचण्यापेक्षा या पारंपरिक कलांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ मिळायला हवे,’’ अशी अपेक्षाही गोखले यांनी व्यक्त केली.  

डॉ. लागू यांच्यासारखी दिग्गज माणसे महाराष्ट्रात जन्मली हे या राज्याचे भाग्य आहे, असे सांगून अमित देशमुख म्हणाले, ‘‘आपला हा ठेवा जोपासणे ही आपली जबाबदारी असून पिफसारख्या महोत्सवांच्या माधयामातून ते घडत आहे. सांस्कृतिक मंत्री म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करीन. मराठी भाषा, कला, संस्कृती, नाट्य आणि चित्रपट यांच्या जोपासनेसाठी हे सरकार कटिबद्ध आहे.’’

‘‘सीआयडी मालिकेच्या निमित्ताने मी शिवाजी साटम, अभिजित श्रीवास्तव व सदानंद शेट्टी यांच्याबरोबर सलग २२ वर्षे काम केले. कोणत्याही कराराशिवाय आणि त्याच उत्साहाने आम्ही कुटुंबाप्रमाणे कार्यरत राहिलो,’’ अशा भावना बी. पी. सिंग यांनी व्यक्त केल्या.

उद्घाटन समारंभानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटीनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून लॉ कॉलेज रस्ता व कोथरूड येथील एनएफएआयमध्ये दाखविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *