पुण्याच्या भातशेतीवर साकारले ‘चापडा’ सापाचे चित्र

Marathi

निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात मात्र त्यांचेच चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर चितारण्याचा अनोखा प्रयोग हौशी वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर हे गेली तीन वर्ष करत आहेत. यंदा चौथ्या वर्षी त्यांनी ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून ‘चापडा’ सापाचे भव्य चित्र साकारले आहे. हिरव्या रंगाखेरीज त्रिकोणी डोके आणि अगदी कमी जाडीची मान हे वैशिष्ट्य असणारा हा साप कारवीच्या झुडुपात सापडतो.  

सह्याद्रीच्या द-याखो-यातील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. मागील तीन वर्षी त्यांनी यातूनच साकारलेला गणपती, काळा बिबट्या व पाचू कवडा पुणेकरांसाठी आकर्षण ठरले होते. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका ‘कॅन्व्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले. या वर्षी इंगळहळीकर यांनी ‘चापडा’ या पश्चिम घाटात सापडणाऱ्या दुर्मिळ सापाची १२० बाय ७० फूट आकाराची प्रतिमा सादर केली आहे.

सह्याद्रीमध्ये माथेरान, भीमाशंकर, महाबळेश्वर, कोयना, आंबोली आणि गोवा अशा सावलीच्या जंगलात ‘चापडा’ साप दिसतात. लहान मोठ्या झाडांच्या फांद्यांवर आढळणारा हा साप उंदीर, सरडे, झाडावरील बेडूक हे त्याचे खाद्य असते, अशी माहितीही यावेळी इंगळहळीकर यांनी दिली. येत्या काही वर्षांत काळा गरुड, मलबार ग्लाईडिंग बेडूक यासह सह्याद्रीच्या जंगलातल्या दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि इतर जीवांच्या प्रतिमा सादर करण्याचा विचार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *