वाहन उद्योग क्षेत्राची पुण्यातील व्याप्ती लक्षात घेऊन भारतातील पहिला ‘वेट ब्रेक्स व क्लचेस’ बनविण्याचा कारखाना ‘मिबा ड्राईव्हटेक इंडिया’ (एमडीआय) यांच्या पुढाकाराने पुण्यात २००७ मध्ये सुरु करण्यात आला होता. आता त्याची वाढती मागणी लक्षात घेऊन नगर रस्त्याजवळील कोरेगाव भीमा येथे मोठ्याप्रमाणात नवीन प्रकल्प साकारण्यात येत आहे. पुण्यातील हा प्रकल्प ‘मिबा एजी ऑस्ट्रीया’ यांचीच एक शाखा असून याचे उद्घाटन ऑस्ट्रियाचे भारतातील राजदूत ब्रिजीट ऑपिंगर वॉलशॉफर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
चालत्या वाहनाला थांबवताना ब्रेक्स आणि चाकांमध्ये घर्षण होऊन उष्णता निर्माण होते, त्यामुळे कालांतराने ब्रेक्स निकामी होण्याची, अपघात होण्याची शक्यता असते. ही शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याची क्षमता ‘वेट ब्रेक्स’मध्ये असते. यात ब्रेक्सच्या यंत्रणेत वंगणाचा वापर केलेला असल्याने घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता कमी होते. त्यामुळेच याला ‘कूल्ड डिस्क ब्रेक्स’देखील म्हणतात. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ‘मिबा’ ग्रुपचे अध्यक्ष एफ. पीटर मीटरबॉर, ‘मिबा फ्रिक्शन’ ग्रुपचे महाव्यवस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मार्टिन लीबेल, ‘मिबा ड्राईव्हटेक इंडिया प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश बर्वे, चेन्नई येथील ‘ब्रेक्स इंडिया प्रा. लि.’च्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे कार्यकारी संचालक व्ही. बद्री आदि उपस्थित होते.
‘वेट ब्रेक्स व क्लचेस’च्या या प्रकल्पासाठी ‘मिबा ड्राईव्हटेक इंडिया’ या कंपनीने ९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या ही कंपनी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या दृष्टीकोनातून ब्रेक्स, ट्रान्स्मिशन्स, अॅक्सल्स, क्लचेस या भागांचे उत्पादन करते. तर पुण्यातील प्रकल्पातून फ्रिक्शन डिस्क व स्टील डिस्कचे २५ लाखापेक्षा अधिक उत्पादन घेण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे त्यांचा देशभरात व्यावसायिक वाहने व ट्रॅक्टरसाठी ‘ड्राय क्लचेस’ उद्योग अधिक विकसित करण्याचा मानस आहे.
यावेळी सतीश बर्वे म्हणाले, “या ‘वेट ब्रेक्स व क्लचेस’ उत्पादनामुळे महामार्गावरून धावणाऱ्या व्यावसायिक वाहनांना ‘ड्राय ब्रेक’ शिवाय एक पर्याय उपलब्ध होणार आहे. पुण्यात वाहन उद्योगातील अनेक उत्पादक व ग्राहक आहेत. त्यामुळे आम्हाला या प्रकल्पासाठी पुणे अगदी योग्य ठिकाण वाटले. शिवाय पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असल्याने भविष्यातील आवश्यक तंत्रज्ञदेखील येथे आहेत.”