बांधकामातील काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘मॅच्युरिटी मीटर’ उपकरण विकसित

Marathi

बांधकामात वापरल्या जाणा-या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रीसर्च फाऊंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे.

‘पीसीईआरएफ’चे अध्यक्ष विश्वास लोकरे यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष संजय वायचळ, उपाध्यक्ष जयंत इनामदार, मानद सचिव नीळकंठ जोशी, तसेच या उपकरणाच्या विकसनात महत्त्वाची भूमिका बजावलेले डॉ. हेमंत धोंडे व डॉ. राजेश घोंगडे या वेळी उपस्थित होते. पीसीईआरएफ ही ३५ वर्षे जुनी व विनानफा तत्त्वावर चालणारी संस्था असून बांधकाम क्षेत्रातील नवीन आणि किफायतशीर तंत्रज्ञान या व्यवसायातील संबंधितांपर्यंत पोहोचवणे, या नवीन तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण देणे आणि उपयुक्त संशोधन करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. पीसीईआरएफचे माजी अध्यक्ष श्रीकांत निवसरकर, पीसीईआरएफचे व्ही. व्ही. बडवे यांचीही या वेळी उपस्थिती होती.

‘इंटलिजंट काँक्रीट मॅच्युरिटी मीटर’ नावाचे हे उपकरण संपूर्णतः भारतीय बनावटीचे, थेट मोबाईलला जोडण्याजोगे आणि अगदी हाताच्या तळव्यावर मावेल इतके छोटे आहे. त्याचा वापर सोपा असून खास भारतातील बांधकाम क्षेत्रातील अडचणींचा विचार करूनच त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या उपकरणाच्या वापरामुळे बांधकाम प्रकल्पाच्या खर्चात १० ते १२ टक्के बचत होणार आहे. सध्या परदेशी बनावटीचे मॅच्युरिटी मीटर किट ३ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत मिळते. भारतीय मॅच्युरिटी मीटर किट साधारणतः ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध करून देता येईल. भारतीय बनावटीच्या या उपकरणाला ‘इंडियन स्टँडर्ड कोड’ची मान्यता मिळावी यासाठी पीसीईआरएफतर्फे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आतादेखील हा भारतीय मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मान्यतांचे निकष पूर्ण करतो.

लोकरे म्हणाले, ‘‘सध्या बाजारात उपलब्ध असलेले मॅच्युरिटी मीटर हे परदेशी बनावटीचे आणि खर्चिक आहेत. हे मीटर वापरण्यासाठी लागणा-या प्रशिक्षणावरही मोठा खर्च होतो. परिणामी ब-याचदा त्याचा वापर टाळून पारंपरिक डिस्ट्रक्टिव्ह पद्धतींनीच काँक्रीटची मजबुती काढली जाते. या पद्धतीला असलेल्या मर्यादांमुळे परदेशी उपकरणांना अस्सल भारतीय बनावटीचा स्वस्त पर्याय देण्याचा पीसीईआरएफचा प्रयत्न होता. हा भारतीय मॅच्युरिटी मीटर वापरून कमी खर्चात अचूक प्रकारे काँक्रीटची मजबुती मोजता येईल. बांधकाम क्षेत्राला आणि पर्यायाने सामान्य माणसालाही याचा मोठाच फायदा होणार आहे.’’

या मॅच्युरिटी मीटरची चाचणी पूर्ण झाली असून व्यावसायिक रुपांतरासाठी हे उपकरण तयार असल्याचेही लोकरे यांनी सांगितले. या उपकरणाच्या पेटंटसाठी देखील अर्ज करण्यात आला आहे.

येत्या १६ ते १९ जानेवारी दरम्यान सिंचननगर येथील अॅग्रीकल्चरल कॉलेज ग्राऊंडवर होणा-या ‘कॉन्स्ट्रो’ या सोळाव्या द्वैवार्षिक प्रदर्शनात हे संशोधन सादर केले जाणार आहे. बांधकामासाठी आवश्यक यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि प्रकल्प या संबंधीचे सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून कॉन्स्ट्रो ओळखले जाते. ‘मेकॅनाइज्ड अॅण्ड इंटेलिजन्ट कन्स्ट्रक्शन’ही या वर्षीच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *