सांडपाणी व कचर्याच्या सफाईचे काम सन्मानाने व आपले आरोग्य सुरक्षित राखून करताना सफाई कर्मचा-यांनी सुरक्षा साधने न चुकता वापरावीत, या उद्देशाने पुण्यातील ५०० सफाई कर्मचा-यांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ व स्टिल इंडियाच्या पुढाकाराने आयोजित हे प्रशिक्षण कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कॅम फाऊंडेशनद्वारे दिले जात आहे. आज या उपक्रमातील १५० स्वच्छता कर्मचा-यांना ‘सेफ्टी किट’चे वाटप करण्यात आले.
स्टिल इंडिया या कंपनीने या उपक्रमास आर्थिक साहाय्य पुरवले आहे. म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य केंद्रात आयोजित या कार्यक्रमासाठी स्टिल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक परिंद प्रभूदेसाई, विपणन प्रमुख शोभित बहल, एच आर व्यवस्थापक हेतल रावल, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे अध्यक्ष अभिजित जोग, पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कॅम फाऊंडेशनच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी स्मिता सिंग, सल्लागार मनोहर कृष्णा, घनकचरा विभागाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी घाटगे, पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे आदि उपस्थित होते.
अभिजित जोग म्हणाले, “सीमेवर लढणारे सैनिक आणि देश समृद्ध करण्यासाठी झटणारे शेतकरी व कामगार यांच्याच बरोबरीने स्वच्छता कर्मचा-यांचे स्थान असून स्वच्छता कर्मचारी सक्षम झाला तरच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होऊ शकते. हा उपक्रम केवळ ५०० कर्मचा-यांपुरता मर्यादित न राहता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे.”
“स्वच्छता कर्मचार्यांचे कार्य अतिशय महत्वाचे असून त्यांच्या कामाचा योग्य तो सन्मान व्हायला हवा व त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या सुरक्षेचे महत्व त्यांना समजावून द्यायला हवे ही रोटरीने मांडलेली भूमिका आम्हाला मनापासून पटल्यामुळे या प्रकल्पाला अर्थसहाय्य देण्याचे आम्ही ठरविले,” अशी माहिती स्टिल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक परिंद प्रभुदेसाई यांनी दिली.
पुण्यात प्रतिदिन २१०० मेट्रिक टन कचरा तयार होत असून त्यातील १५०० मेट्रिक टन कच-यावर रोज प्रक्रिया केली जाते, असे सांगून मोळक म्हणाले,“पुण्यात कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ५७ प्रकल्प आहेत, त्यात नजिकच्या भविष्यात आणखी ५ कचरा प्रक्रिया प्रकल्पांची भर पडणार आहे. येत्या ३१ डिसेंबरनंतर उरुळी-फुरसुंगीला एक किलोदेखील कचरा न पाठवता सर्व कच-यावर पुणे शहरातच प्रक्रिया करण्याचे आमचे लक्ष्य आहे. शहराच्या स्वच्छतेत सफाई कामगारांचे योगदान मोठे असून त्यांनी कामाच्या ठिकाणी आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही नागरिकांचीही जबाबदारी असून त्यांनी त्याचा विचार करायला हवा.”