महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशनमध्ये ५ वर्षांसाठी करार

Marathi

शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या खेळाकडे नवा तरुण आकर्षित व्हावा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी उत्तम कामगिरी करणारे पहिलवान महाराष्ट्राच्या मातीतून घडावेत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर ५ वर्षांसाठी करार केला आहे.

याअंतर्गत स्पर्धेचे आयोजन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, ज्याचा फायदा सहभागी मल्लांसोबतच प्रेक्षकांनाही व्हावा व स्पर्धेचा स्तर विविध पातळीवर उंचवावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते या वेळी उपस्थित होते. या वेळी स्पर्धेच्या नवीन बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.

या कराराअंतर्गत यंदाच्या ६३ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन जानेवारीत पुण्यात केले जाणार आहे. ही स्पर्धा २ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल येथे होणार आहे. या अंतर्गत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी १० अशा एकूण २० गटांमध्ये कुस्ती स्पर्धा घेतल्या जातील, असेही लांडगे यांनी सांगितले. वजनी गटांमध्ये ५७ किलो, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असे दहा वजनी गट आहेत. या स्पर्धेत कुस्तीगीरांचे ४५ संघ भाग घेणार असून तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर व १२५ पंच या स्पर्धेसाठी येणार आहेत. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज केले जात आहेत.

ते म्हणाले, ‘‘भारतात कुस्ती हा खेळ शेकडो वर्षांपासून खेळला जात आहे. कुस्तीचा महाराष्ट्रातील इतिहासही तितकाच गौरवशाली असून १९६१ सालापासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेने अनेक नामांकित मल्ल भारताला दिले. अशा या स्पर्धेस अधिक भव्य स्वरूप देऊन तिची लोकप्रियता आणखी वाढवण्यासाठी कराराच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. स्पर्धेची सध्याची लोकप्रियता लक्षात घेता त्याचे योग्य विपणन (मार्केटिंग) केल्यास चांगल्या पद्धतीचे निधी संकलन होऊ शकते. ज्याचा विनियोग राज्यात कुस्ती या खेळाला पुढे नेण्यासाठी करता येऊ शकतो. त्याच दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.’’

रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे म्हणाले, ‘‘देशी खेळ कात टाकून नवीन पद्धतीने लोकांसमोर येण्यास सुरूवात झाली आहे आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर त्याचा आनंद घेताना दिसत आहेत.  कबड्डी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. याच प्रकारे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे मोठ्या व्यावसायिक स्वरूपात आयोजन केले गेले आणि त्यामुळे प्रेक्षकवर्गात वाढ झाली तर कुस्तीच्या परंपरेस त्याचा फायदाच होईल. राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कॉर्पोरेशनच्या झालेल्या या करारातून हे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यातून निर्माण होणा-या निधीतून परिषद गरजू आणि गुणवान कुस्तीगीरांना शिष्यवृत्ती सुरू करणार आहे. शिवाय परिषदेच्या माध्यमातून वर्षभर कुस्तीगीरांसाठी प्रशिक्षण शिबिरे राबविली जाणार आहेत. ऑलिंपिक व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कुस्तीगीरांची निवड होऊन चांगली कामगिरी व्हावी अशी अपेक्षा आहे.’’  

मल्लांना तयारीसाठी योग्य वेळ मिळावा तसेच स्पर्धेचे आयोजन देखील उत्तम रितीने व्हावे यासाठी यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा साधारणतः ६ महिने ते १ वर्ष आधीच जाहीर केली जाईल, असेही बुचडे यांनी सांगितले.

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा अभिमानास्पद असून या मातीतल्या मल्लांमध्ये मोठी क्षमता आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेस दिलेल्या पाठबळातून ही स्पर्धा आकर्षक स्वरूपात व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. यातून कुस्तीगीरांना आणि एकूणच कुस्ती या खेळाला फायदा होणार आहे.राज्यात कुस्तीच्या बाबतीत मागास असलेल्या जिल्ह्यांमध्ये कुस्तीचा प्रचार- प्रसार करण्यासाठीही परिषदेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *