राजगडाच्या पायथ्याशी मिळणार शेतकऱ्याच्या घरात राहण्याचा आनंद

Marathi

शहरी वातावरणापासून दूर, अस्सल गावरान आणि मोकळ्या हवेचा आनंद, गाव, शेती, शेतकरी याविषयी शहरी भागातील लोकांना कुतूहल असते. या सगळ्याचा आता प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. खुद्द शेतकऱ्याच्या घरात राहून, त्यांच्या दिनचर्येत सहभागी होण्याची संधी भोर तालुक्यातील निसर्गसंपन्न कुरुंजी व मळे गावांतील ‘व्हिलेज होम स्टे’द्वारे मिळणार आहे. याचे नुकतेच प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

भाटघर धरणाचे जलाशय, राजगडाचा हिरवागार पायथा अशा निसर्गसंपन्न भागात या ‘व्हिलेज होम स्टे’ची सुरुवात झाली आहे. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैसवाल, सिनर्जी हॉलीडे व्हिलेजचे संचालक मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव, राजेंद्र आवटे आदि मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन झाल्यावर गावकरी व उपस्थितांनी सुबोध भावे यांच्यासोबत गावात फेरफटका मारून छोट्या खेड्यातील निसर्गसंपन्न वातावरणाचा व जीवनशैलीचा आनंद घेतला. हा ‘व्हिलेज होम स्टे’ प्रकल्प ‘सिनर्जी हॉलीडे व्हिलेज रिसॉर्ट’च्या सहकार्याने पुढे नेण्याचा मानस असल्याचे मंदार देवगावकर यांनी सांगितले.

यावेळी भावे म्हणाले, “कामाच्या शोधात लोक शहरांकडे वळतात आणि त्या धकाधकीत जीवनाचा आनंद गमावून बसतात. मात्र असे ‘व्हिलेज होम स्टे’, ज्यामुळे गावातील हा निसर्ग, साधे जीवन व त्यातून मिळणारा निखळ आनंद मिळेल आणि हे लोकांना नक्कीच विसाव्याचे सुखद क्षण देतील. शेतकरी आपला अन्नदाता आहे, हे हल्लीचे शहरी मुलं फक्त ऐकतात. मात्र शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचे जीवन नक्की कसे असते. हे यामुळे मुलांना अनुभवायला मिळेल ज्यातून त्यांची शेती, शेतकरी यांच्याविषयी आपुलकी वाढेल. खेड्यातील स्वच्छंदी व मोकळ्या आयुष्याचा अनुभव त्यांना घेता येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *