विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे , एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातिल सर्वात मोठ्या घुमटातील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्व शांती प्रार्थना सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, बुधवार, दि. 2 ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटचे (World Parliament of Science, Religion and Philosophy) आयोजन करण्यात आले आहे.
या वर्ल्ड पार्लमेंटचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. 2 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. यावेळी विश्व प्रसिद्ध तत्वज्ञानी, विद्वान, विचारक, संस्कृतचे विद्वान, महान दूरदर्शी आणि संवेदनशील व माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण डॉ. करण सिंह हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे ‘आंतरधर्मीय संवाद आणि विश्वशांती’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व जगप्रसिध्द संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पटणा येथील थोर विचारवंत, विद्वान, तत्वज्ञ आणि गांधीवादी डॉ. रामजी सिंग आणि मद्रास विद्यापीठाच्या डॉ. एस. राधाकृष्णन इन्स्टीट्यूट ऑफ अॅडव्हॉन्स्ड स्टडी इंन फिलॉसॉफीचे संचालक व प्रसिद्ध शिक्षक, विचारवंत, तत्वज्ञ प्रा. डॉ. टी. एस. देओदास यांना ‘महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या तीन दिवस भरविल्या जाणार्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये 8 सत्रे असतील. यात खालील विषयांवर चर्चा होणार आहे.पहिले सत्रः विज्ञान आणि अध्यात्माच्या भूमिकेच्या आकलनाच्या आधारे वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देण्याची गरज. दुसरे सत्रः वैश्विक शांतीप्रिय समाजाच्या उभारण्यासाठी गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांची आवश्यकता.तिसरे सत्रः जगातील सर्व धर्मग्रंथ हे खर्या अर्थाने जीवनग्रंथच आहेत.चौथे सत्रः विज्ञान आणि धर्माची पुनर्रचना करता येईल काय, त्या मधील मुख्य अडथळे कोणते. विज्ञान की धर्म?पाचवे सत्रः धर्म, विज्ञान की तत्वज्ञान यापैकी प्रथम काय?सहावे सत्रः जगात शांती संस्कृती आणण्यासाठी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीबद्दल माझे विचार. (विद्यार्थी आणि शिक्षक)सातवे सत्रः जगातील सर्व विद्यापीठे संशोधन, नवनिर्मिती, वैज्ञानिक ज्ञान आणि सर्वांगीण मानव विकासाचे कार्य करणार्या खर्या ज्ञानकेंद्रांमध्ये परिवर्तित करण्याची गरज. आठवे सत्रः सकारात्मक विचार आणि मानसिकता विकसित करण्यासाठी मानवी मन, चैतन्यस्वरुप तत्त्व आणि योग, विपश्यना, प्राणायाम, नमाज, प्रार्थना जप इ. ध्यानाचे प्रकार व त्यांचा उपयोग.
या तीन दिवस चालणार्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये जागतिक स्तरावरील अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, थायलंड, पोलंड, जपान, अफगाणिस्थान, नेपाळ व जर्मनी येथील वक्ते, तसेच विविध क्षेत्रातील विद्वान, तत्त्वज्ञ, धर्मगुरू, शास्त्रज्ञ, कुलगुरू, शिक्षण तज्ञ, समाजचिंतक, इ. क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत.