विक्रम गोखले यांचा पिफ दरम्यान विशेष सन्मान

Marathi

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शक असलेल्या बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना १८ व्या  ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ या पुरस्कार देत सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पुणे फिल्म फाऊंडेशनचे विश्वस्त रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ट्रायबल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उपसंचालक हंसध्वज सोनावणे, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनचे सहयोगी संचालक प्रो. अमित त्यागी या वेळी उपस्थित होते.

या वर्षीचा पिफ महोत्सव दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात येणार असून महोत्सवाच्या प्रमुख प्रवेशद्वारास डॉ. लागू यांचे नाव देण्यात येणार आहे, तसेच लागू यांचे काही निवडक चित्रपट देखील महोत्सवात पाहायला मिळतील. ‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १८ वे वर्ष असून ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही यावर्षीची ‘थीम’ आहे. येत्या गुरूवारी दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी बी. पी. सिंग, विक्रम गोखले आणि उषा खन्ना यांना वरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची खास उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटीनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून लॉ कॉलेज रस्ता व कोथरूड येथील एनएफएआयमध्ये दाखविला जाईल, अशी माहितीही डॉ. पटेल यांनी यावेळी दिली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत मराठी स्पर्धात्मक चित्रपटांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली. या विभागात या वर्षी ६० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यातून निवड झालेले ७ मराठी चित्रपट पुढीलप्रमाणे –
१ ) ‘तुझ्या आईला (शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते)’ – दिग्दर्शक सुजय सुनिल डहाके, २) ‘चिवटी’ – दिग्दर्शक राजकुमार लक्ष्मणराव तांगडे, ३) ‘वाय’- दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर, ४) ‘फोटो प्रेम’ – दिग्दर्शक आदित्य राठी व गायत्री पाटील, ५) ‘स्माईल प्लीज’ – दिग्दर्शक विक्रम फडणीस, ६) ‘बोन्साई’ – दिग्दर्शक समीर आशा पाटील, ७) ‘आनंदी गोपाळ’ – दिग्दर्शक समीर संजय विद्वांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *