‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुण्यातील खोपा’चे महत्त्वपूर्ण पाऊल

Marathi

सर्वांसाठी घर हा विषय गेली काही वर्षे जोमाने चर्चेत असला, तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तसेच अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी शहरांमध्ये चांगली आणि परवण्याजोगी घरे हे स्वप्न अजुनही त्या प्रमाणात साकार झालेले नाही. परवडणा-या घरांच्या श्रेणीतील सध्या उपलब्ध असलेली घरे मध्य शहरापासून दूर असतात, शिवाय अनेकदा हे गृहप्रकल्प उभारताना ग्राहकांच्या ख-या गरजांचा विचारच होत नाही. घरांची असलेली गरज आणि पुरवठा यात समन्वय साधून ग्राहकाला हवे तसे आणि खिशाला परवडणारे घर मिळावे, या उद्देशाने पुण्यातील ‘खोपा टेक्नाॉलॉजीज’ या स्टार्टअप संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

‘खोपा टेक्नॉलॉजीज’चे सहसंस्थापक मेघ घोलप यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे अन्य सहसंस्थापक देवदत्त बोराळकर, नितीन टाकळकर आणि डॉ. गीतांजली घोलप या वेळी उपस्थित होते.  

संस्थेतर्फे पुण्यात ६ ठिकाणी तब्बल १२,००० कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून एक सर्वेक्षण केले आहे. ही सर्व कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत. या व्यक्तींना कशी सदनिका हवी आहे, आपल्या गृहप्रकल्पात त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत या प्रश्नांची उत्तरे संस्थेने या सर्वेक्षणातून जाणून घेतली असून नव्याने बांधली जाणारी परवडणारी घरे कशी असावीत हे अवघड समीकरण संस्थेने सोडवले आहे.

बांधकाम विकसक आणि गृहकर्जे देणा-या संस्थांबरोबरच सरकारलाही या संशोधनाचा उपयोग होणार आहे. ‘खोपा’तर्फे परवडणारी घरे बांधणारी मंडळी, घर ग्राहक आणि या व्यवहाराशी निगडित सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी एक मॉडेल (प्रारूप) तयार करण्यात आले असून परवडणारी घरे ही आदर्श स्वरूपाचीच असावीत यासाठी संस्था मार्गदर्शन करणार आहे.

हे सर्वेक्षण हडपसर-सोलापूर रस्ता, कात्रज-कोंढवा, वारजे-कोथरूड-पौड रस्ता, सिंहगड रस्ता, औंध-बाणेर-पाषाण आणि नगर रस्ता-विमाननगर या ६ ठिकाणी करण्यात आले आहे.

‘खोपा’चे हे मॉडेल वापरून लवकरच एक पथदर्शी प्रकल्प सुरू होत असल्याचे डॉ. गीतांजली घोलप यांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावर धायरी येथे पुणे महापालिकेच्या हद्दीत २९० सदनिकांचा व या सर्वेक्षणातील निष्कर्षांशी पूर्णतः सुसंगत असा एक गृहप्रकल्प साकारतो आहे.या गृहप्रकल्पातील सर्व सदनिका २ बीएचके असून अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या तुलनेत या संपूर्णपणे अधिकृत अशा प्रकल्पातील सदनिकांच्या किमती तोडीस तोड असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *