पुण्यातील सानिध्य शहा आणि विवेक वनारसे या वास्तुस्थापत्यशास्त्राच्या (आर्किटेक्चर) विद्यार्थ्यांनी ‘द ड्राॉईंग बोर्ड’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘द ड्राॉईंग बोर्ड’ ही वास्तुस्थापत्य क्षेत्रातील नैऋत्य आशियातील महत्त्वाची स्पर्धा समजली जात असून बंगळुरूमधील माईंडस्पेस आर्किटेक्ट्स आणि पुण्यातील रोहन बिल्डर्स यांच्यातर्फे त्याचे आयोजन केले जाते.
सानिध्य आणि विवेक हे ‘व्हीआयटी’ संस्थेच्या ‘पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’चे विद्यार्थी आहेत. त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून ५० हजार रुपये तसेच रोहन बिल्डर्सबरोबर प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कर्वे नगर येथील भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे गेल्या आठवड्यात पार पडला.
‘द ड्राॉईंग बोर्ड’ स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. वाकडेवाडी येथे असलेली १४० वर्षे जुनी आणि उंच अशी पाण्याची टाकी दुरून देखील दिसून येते. असे असले तरी या भागात राहणारे नागरिक व विशेषतः शहरी समाजाच्या दृष्टीने त्याचे काही अस्तित्त्व नाही. हे अस्तित्त्व अधोरेखित करणे व एक प्रकारे जुन्या बांधकामांशी नागरिकांचा संवाद प्रस्थापित करणे, हा या वर्षीच्या स्पर्धेचा विषय होता.
माईंडस्पेस आर्किटेक्ट्सचे संजय मोहे, सिंगापूरमधील ‘बेदमार आणि शी’ या वास्तुस्थापत्य संस्थेचे अर्नेस्टो बेदमार आणि श्रीलंकेच्या पलिंडा कन्नागारा आर्किटेक्ट्सचे पलिंडा कन्नागारा यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
गुजरातमधील शर्मन मेहता, सिद्धांत मनपारा व अक्षय पटेल यांना ‘फर्स्ट रनर अप’चे ३५,००० रुपयांचे पारितोषिक, तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या ‘व्हीआयटीज पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या रवी वर्मा, वैभवी पुजारी व आशुतोष मुंदडा यांना २५,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत श्रीलंकेतील विद्यार्थ्यांच्या एक संघाने पहिला १० संघांमध्ये स्थान मिळविले होते.
‘बीएनसीए’, ’२४ एडीपी’, ‘आयएनटीएसीएच’, ‘लीवार्डिस्ट्स’, ‘आर्किटेक्चर लाईव्ह’, ‘डिझाईन पताकी’, ‘व्हीनस ट्रेडर्स’ व ‘प्रयेश प्रिंट’ यांचे सहकार्य या स्पर्धेस लाभले होते.