सोळावे ‘कॉन्स्ट्रो २०२०’ प्रदर्शन १६ ते १९ जानेवारीदरम्यान कृषी महाविद्यालय, सिंचननगर येथे

Marathi

बांधकामासाठीची आधुनिक यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि प्रकल्प या संबंधीचे पश्चिम भारतातील सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून ओळखले जाणारे ‘कॉन्स्ट्रो २०२०’ हे प्रदर्शन येत्या १६ ते १९ जानेवारीदरम्यान पुण्यात कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर येथे होणार आहे. ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन’तर्फे (पीसीईआरएफ) आयोजित केल्या जाणा-या या द्वैवार्षिक प्रदर्शनाची ही सोळावी आवृत्ती असून ‘मेकॅनाइज्ड अॅण्ड इंटेलिजन्ट कन्स्ट्रक्शन’ ही प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

‘पीसीईआरएफ’चे अध्यक्ष विश्वास लोकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘कॉन्स्ट्रो २०२०’चे अध्यक्ष संजय वायचळ, पीसीईआरएफचे मानद सचिव नीळकंठ जोशी, कॉन्स्ट्रोच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य नरेन कोठारी आणि पीसीईआरएफचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १६ जानेवारी रोजी ‘एल अँड टी’चे संचालक व वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (इन्फ्रास्ट्रक्चर) डी. के. सेन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जवळपास १ लाखाहून अधिक व्यक्ती या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे.

लोकरे म्हणाले, ‘‘‘मेकॅनाइज्ड अॅण्ड इंटेलिजन्ट कन्स्ट्रक्शन’ ही प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रदर्शनात इमारत बांधकाम अधिनियम अर्थात ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोड’, हरित व शाश्वत पद्धतींचा अवलंब केलेल्या इमारती, बांधकामातील कौशल्य विकसन आणि साईटवरील सुरक्षितता यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. बांधकामात वापरली जाणारी जागतिक दर्जाची आधुनिक यंत्रे व पद्धतींपासून कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि नवीन वॉटर प्रूफिंग पद्धतींपर्यंत सर्व गोष्टींची माहिती या प्रदर्शनात घेता येणार आहे. पीसीईआरएफतर्फे बांधकामातील काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी संपूर्णतः भारतीय बनावटीचे आणि कमी खर्चिक असे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित करण्यात आले आहे. हे उपकरणही प्रदर्शनात सादर केले जाणार आहे.’’

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘कॉन्स्ट्रो’मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) व वास्तुस्थापत्य (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीईआरएफ- पद्मश्री बी. जी. शिर्के विद्यार्थी पुरस्कार २०२०’ प्रदान केले जाणार आहेत.

तसेच बांधकामातील सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम काम करणाऱ्या निवडक संस्थांना ‘पीसीईआरएफ- कुमार बेहेरे कन्स्ट्रक्शन सेफ्टी पुरस्कार २०२०’ हे पुरस्कार दिले जाणार आहेत. ‘‘बांधकाम क्षेत्रात महिला उद्योजकांची संख्या कमी असून महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘पीसीईआरएफ- विमेन आंत्रप्रेन्युअर्स इन कन्स्ट्रक्शन’ हे विशेष पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. बांधकाम कंत्राटदार, स्ट्रक्चरल कन्स्लंटंट, बांधकाम व्यावसायिक व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्स्लंटंट म्हणून उत्तम कामगिरी बजावलेल्या महिला उद्योजिकांचा गौरव केला जाणार आहे.’’

या प्रदर्शनादरम्यान त्याच ठिकाणी ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची (बीएआय) महाराष्ट्र राज्यस्तरीय बैठक देखील घेतली जाणार आहे. प्रामुख्याने रेरा कायदा आणि बांधकाम कर्मचा-यांचे कौशल्य विकसन यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. बांधकाम तंत्रज्ञानाविषयी माहिती देणा-या स्मरणिकेचे प्रदर्शनादरम्यान प्रकाशन केले जाणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित विषयांवरील पथनाट्यांचेही दररोज प्रदर्शनाच्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. पीसीईआरएफविषयी- पीसीईआरएफ ही ३५ वर्षे जुनी व विनानफा तत्त्वावर चालणारी संस्था असून बांधकाम क्षेत्रातील नवीन आणि किफायतशीर तंत्रज्ञान या व्यवसायातील संबंधितांपर्यंत पोहोचवणे, या नवीन तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण देणे आणि उपयुक्त संशोधन करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *