बांधकाम व्यावसायिकांना आता आपल्या गृहप्रकल्पाची महारेरा नोंदणी करण्यापूर्वी राज्यातील कोणत्याही महारेरा मान्यताप्राप्त स्वयंनियामक संस्थेकडे (एसआरओ) स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार असून महारेरातर्फे नुकतेच त्याविषयीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
या निर्णयानुसार महारेराकडे गृहप्रकल्प नोंदणीकृत करताना बांधकाम व्यावसायिकांना महारेराच्या संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेचे सदस्यत्त्व घेणे बंधनकरक आहे. या एसआरओ संस्थांमध्ये क्रेडाई महाराष्ट्र व इतर दोन संस्थांचा समावेश आहे.अधिकाधिक बांधकाम व्यावसायिकांनी ही नोंदणी करून घ्यावी यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आवाहन केले जात असून ही प्रक्रिया ऑनलाईन करून सोपी करण्यात आली आहे, अशी माहिती ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.
”ज्या बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाईचे कायम सदस्यत्त्व घेतलेले नाही, त्यांच्यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे ‘रेरा प्रोजेक्ट मेम्बरशिप’ हा विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात बांधकाम व्यावसायिकांना विशिष्ट गृहप्रकल्पापुरतेच क्रेडाईचे सदस्यत्त्व घेता येणार असून त्यामुळे त्यांना त्या प्रकल्पाची महारेरा नोंदणी करणे सोपे जाईल. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि आजूबाजूच्या भागातील बांधकाम व्यावसायिक या पर्यायाचा लाभ घेऊ शकणार आहेत. क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे या बांधकाम व्यावसायिकांना रेरा कायद्याविषयीची माहिती, महारेरा नोंदणीसाठीचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. महारेरा आणि बांधकाम व्यावसायिकांमधील संवाद वाढवण्यासाठी यामुळे एक प्रकारे मदतच होईल. ”, असेही मर्चंट यांनी सांगितले.