सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे नेटवर्क१८च्या सहकार्याने लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतात वर्षभर ही मोहीम राबवली जाणार
राष्ट्रीय, २१ फेब्रुवारी २०१९: ख्यातनाम अभिनेत्री करीना कपूर खान यांना स्वस्थ इम्युनाइज्ड इंडिया या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर घोषित करण्यात आले आहे. लसीकरण आणि टिकाकरणाच्या जनजागृतीसाठी देशभरात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीने नेटवर्क१८च्या साह्याने आखलेली ही मोहीम आरोग्यदायी भारताच्या दिशेने लहानपणीच सर्व लसी देण्याची आवश्यकता असते, याबद्दल जनजागृती करत दमदार संपर्कजाळे निर्माण करणार आहे.
या मोहिमेबद्दल करीना कपूर खान म्हणाल्या, “मुलांना आरोग्यदायी आयुष्य देऊ करण्याकरिता आणि लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल कुटुंबांना शिक्षित करणे, लसीकरणाला चालना देणे यासाठीची ही स्वस्थ इम्युनाइज्ड इंडिया मोहीम फारच महान कार्य आहे. एक आई म्हणून माझ्या मुलाला धोकादायक आजारांपासून दूर ठेवण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. म्हणूनची ही मोहीमसुद्धा माझ्यासाठी खास आहे. उपलब्धतेची वानवा आणि न परवडणारे खर्च यामुळे आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू होतात. आता मात्र वेळ आली आहे आपण सर्वांनी एकत्र येण्याची आणि बदलाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची. अदर आणि नताशा पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि नेटवर्क१८च्या या प्रवासाचा भाग होण्यास मी उत्सुक आहेच शिवाय हा मी माझा सन्मान समजते. या मोहिमेच्या माध्यमातून आपण प्रत्येक पालकाला आरोग्यदायी भारताच्या संदर्भात प्रशिक्षित करू शकू आणि त्यांना हे पटवून देऊ शकू, अशी मला आशा आहे.”

वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत समाजाच्या वंचित गटांमध्ये लसीकरणाचे महत्त्व आणि त्यांची निकड याबद्दल करीना जनजागृती करतील. जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी आणि परवडणारे साधन आहे. गेल्या काही वर्षात भारताने पोलिओ आणि देवीच्या रोगाचा लसीकरणाच्या साह्याने देशातून नायनाट केला आहे. इतर आजारांच्या बाबतीतही हे प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, सध्या गोवर, घटसर्प अशा आजारांमुळे भारतात मुले आणि गरोदर मातांचा मृत्यू होत आहे. खरे तर हे आजार लसीकरणाने टाळता येतात. इतकेच नाही, सक्रियपणे प्रयत्न करूनही आजही भारतात सर्वाधिक लसीकरण न झालेली (५६ टक्के) आणि अपूर्ण लसीकरण झालेली (३२ टक्के) मुले आहेत. या मोहिमेबद्दल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला म्हणाले, “स्वस्थ इम्युनाइज्ड इंडिया हे इम्युनाइज्ड भारताच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आपल्या देशात लसीकरण आणि टिकाकरण या संदर्भात कायम असलेल्या विसंवादाच्या प्रश्नावर काम करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. तसेच या मोहिमेतून तान्ही बालके, लहान मुले आणि गरोदर माता यांना आवश्यक लसी देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कामही केले जाणार आहे. एक दमदार व्यक्तिमत्त्व, ठामपणा आणि पुरोगामी विचारसरणी असलेल्या एक आई म्हणजेच करीना कपूर खान आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास साह्य करतील. बदलाचा आवाज म्हणून त्या सामान्य नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व आणि बालकांच्या वाढीसाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे, हे पटवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे.”