पुणे 12 सप्टेंबर २०१७ – कायनेटिक ग्रीन, इलेक्ट्रिक दुचाकींची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आणि स्मार्टई या भारतातील पहिल्या व सर्वात मोठ्या शेअर्ड इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीमध्ये धोरणात्मक करार झाला आहे. यानुसार पुढील १८ महिन्यांत देशभरात १० हजार इलेक्ट्रिक तिचाकी वाहने उपलब्ध केली जाणार आहेत.
या भागिदारीअंतर्गत दिल्ली मेट्रो रेल, एचएसआयआयडीसी आणि रॅपिड मेट्रो गुरगाव यांच्या सहकार्याने ५०० वाहनांची पहिली तुकडी नुकतीच उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेला माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितिन गडकरी यांनी नुकतेच हिरवे निशाण दाखवून शुभारंभ केला. तेव्हापासूनच मेट्रोच्या प्रवाशांचा या सेवेला तुफान प्रतिसाद मिळत आहे, कारण ही वाहने सुरक्षित, परवडणारी आणि अगदी शेवटच्या इच्छित स्थळापर्यंत सेवा देणारी आहेत. येत्या काही महिन्यांत ही सेवा देशभरातील विविध शहरांत सुरू केली जाईल.
या सहकार्याचे महत्त्व विशद करताना सुलज्जा फिरोदिया मोटवानी, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स म्हणाल्या, ‘सर्वसामान्यांना वाहतुकीचा हरित पर्याय उपलब्ध करून देणे हे कायनेटिक ग्रीनचे ध्येय आहे. कायनेटिक ग्रीनला स्मार्टईसह भागिदारीत करून त्याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा विशेषतः भारतीय नागरिकांना इलेक्ट्रिक रिक्षासारखी हरित, प्रयोगशील, परवडणा-या आणि शेवटच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवणारी वाहने प्रचलित करताना आनंद होत आहे. दिल्ली मेट्रो येथे सुरू केलेल्या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही अतिशय आनंदी झालो असून ही सेवा मेट्रो सेवेसह इतर शहरांत पोहोचवून भारतातील नव्या स्मार्ट शहरांना वाहतुकीचा हरित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्याची आशा आहे.’
भारतातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी बस सेवेशिवाय तिचाकी वाहनांना पहिली पसंती दिली जात असल्यामुळे प्रदुषण न करणा-या इलेक्ट्रिक रिक्षा व ऑटो शहरातील प्रदूषण तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावतील आणि हरित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारण्यास मदत करतील.
गोल्डी श्रीवास्तव, सह– संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टई म्हणाले, ‘कायनेटिक ग्रीनशी झालेल्या भागिदारीने आम्ही अतिशय आनंदी झालो असून हा २०३० पर्यंत भारत शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहन राष्ट्र बनवण्याच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आहे. स्मार्टईने गेल्या दोन वर्षांत सहा मिलियन प्रवाशांना आपली इलेक्ट्रिक वाहन सेवा पुरवली आहे. आम्ही ही सेवा वेगाने विस्तारत असून पुढील ८ महिन्यांत प्रवाशांची दैनंदिन सरासरी संख्या एक मिलियनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. आम्हाला देशभरात जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहन सेवा यंत्रणा प्रस्थापित करायची आहे आणि त्याद्वारे वाहनांतून होणारे हायड्रोकार्बन प्रदूषणाचे आव्हान संपवण्यासाठी भरीव योगदान द्यायचे आहे.’
या धोरणात्मक भागिदारीअंतर्गत कायनेटिक स्मार्टईला खास गरजांनुसार बनवलेली वाहने पुरवणार आहे, ज्यांचे बाह्यरूप आकर्षक असेल, शिवाय ती प्रवाशांसाठी आरामदायी व सुरक्षित असतील. ही वाहने देशात- कायनेटिकच्या पुण्याजवळील अहमदनगर येथील कारखान्यात तयार तसेच डिझाइन केली जातील. या वाहनांमध्ये भविष्यातील लक्षणीय तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला असून त्यात आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) क्षमता, आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये, जीपीएस ट्रॅकिंग आणि सेन्सर क्षमता तसेच ग्राहकांना विश्वासार्ह, परवडणारी, सुरक्षित सेवा देण्याची क्षमता आहे.